Coronavirus : राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1462 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 3571 जणांचा मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीत सलग सातव्या दिवशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे 1000-2000 दरम्यान नोंदवण्यात आली आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या दिल्ली सरकारच्या आरोग्य बुलेटिननुसार, गेल्या 24 तासात 1462 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता संक्रमित लोकांची संख्या 1 लाख 20 हजार 107 वर पोहचली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्या 3571 झाली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली आरोग्य मंत्रालयाच्या गेल्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी 1608 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दिल्लीत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या लाखाच्या जवळ पोहचली आहे. दिल्लीत आतापर्यंत 99 हजार 301 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचवेळी दिल्लीत 17 हजार 235 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील रिकव्हरी रेट 84 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, 23 जून रोजी राजधानी दिल्लीत कोरोनामुळे संक्रमीत झालेले 3947 रुग्ण आढळून आले होते. एका दिवसात एवढे रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ होती.

दिल्लीत आज 20 हजार 464 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी आरटीपीसीआर/सीबीएनएटी/ट्रायनाद्वारे 6270 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे 14194 नमुन्यांची तपासणी घेण्यात आली. आतापर्यंत राजधानी दिल्लीत 7 लाख 77 हजार 125 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. दर दहा लाख लोकांमागे 40901 नमुन्यांची तपासणी केली जात आहे.