J & K नं निलंबित केलेले DSP दविंदर सिंह यांना जामीन मंजूर, दिल्ली पोलिस चार्टशीट दाखल करण्यात ‘अपयशी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दहशतवादी कनेक्शन प्रकरणातील आरोपी जम्मू काश्मीर पोलिसांचे निलंबित डीएसपी दविंदर सिंह यांना शुक्रवारी जामीन मिळाला. दविंदर सिंह यांचे वकील म्हणाले, ‘निलंबित डीएसपी दविंदर सिंह यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत आणि त्यामुळे दिल्लीच्या कोर्टाकडून सिंह यांना जामीन मिळाला आहे.’

यापूर्वी दिल्लीच्या कोर्टाने गेल्या महिन्यात 16 जूनपर्यंत दविंदर सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत मुदतवाढ केली होती. दविंदर सिंह यांच्यावर श्रीनगर-जम्मू महामार्गावरील एका वाहनामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना नेल्याचा आरोप करण्यात आला होता.

अशाप्रकारे अटक केली

जानेवारी 2020 मध्ये दविंदरला अटक करण्यात आली होती. कुलगाम जिल्ह्यात सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिस अधिकारी दविंदर सिंह यांना दोन दहशतवाद्यांसह अटक करण्यात आली. हे तिघेही कारमध्ये कुठेतरी जात असताना पकडले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदरसोबत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी कारच्या मागील सीटवर बसले होते.

दहशतवाद्यांना आश्रय देत होते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दविंदरने दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी तीन स्वतंत्र घरे बांधली होती. दविंदरने फक्त आपल्या श्रीनगरमधील इंदिरानगरच्या घरीच दहशतवाद्यांना थांबण्याची व्यवस्था केली नाही तर त्यांची चानपोरा आणि सनत नगर भागात राहण्याची व्यवस्था देखील केली. दहशतवाद प्रकरणात निष्पाप लोकांना फसवून त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांनी ही घरे बांधली गेली असा आरोप देखील आहे.

28 वर्षांपूर्वी देखील करण्यात आले होते निलंबित

1992 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये एका ट्रकमधून ड्रग्ज जप्त केल्याबरोबरच तस्करही पकडला गेला. पैसे घेऊन त्यांनी केस संपवली आणि ड्रग्सही विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास केला गेला आणि दविंदरला निलंबित करण्यात आले. नंतर त्यांनी माफी मागितली आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.