दिल्ली विधानसभा : ‘आप’चे मनिष सिसोदियांच्या माजी विशेष अधिकार्‍याला लाच घेताना अटक

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच दिल्ली सरकारमधील एका बड्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी गोपाल कृष्ण माधव या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गोपाल कृष्ण माधव हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे माजी विशेष अधिकारी (OSD) असल्याचे समजतेय. जीएसटी संबंधित दोन लाख रुपयाची लाच घेताना गोपाल कृष्ण माधव यांना अटक करण्यात आली आहे.

माधव यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने त्यांना तात्काळ मुख्यालयात घेऊन गेले. यासंदर्भात मनिष सिसोदिया यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच सीबीआयनेही याबाबत माहिती  देण्यास नकार दिला आहे. माधव हे 2015 पासून सिसोदियांसोबत काम करत आहेत. दिल्ली निवडणुकांच्या आधी ही कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले असून मनिष सिसोदीया यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीमध्ये उद्या (शनिवार) मतदान होत आहे. मतदान व्यवस्थित पार पडावे यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह 40 हजार जवानाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच 19 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.