दिल्ली Exit Poll : ‘आप’ ला मिळू शकतं 42 ते 56 जागांवर ‘यश’, किती जागांवर भाजपचं ‘कमळ’ फुलणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत 70 विधानसभा जागांसाठी 8 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे, ज्याचा निकाल 11 फेब्रुवारीला समोर येईल. तर निवडणूकीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अशात गुरुवारी म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रचारांचा धुराळा शमला आहे. कोणत्याही पक्षाने प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडलेले नाही. आता 11 फेब्रुवारीला कळेल की जनतेने कोणाच्या गुलदस्त्यात किती मते दिली आहेत. या दरम्यान आता दिल्ली निवडणूकीचे वोटर ओपिनियन पोल समोर येत आहे.

ओपिनियम पोलनुसार, दिल्लीत 42 ते 56 जागांवर आम आदमी पार्टीला यश मिळू शकते तर भाजप 10 – 24 जागांवर विजय मिळवू शकतो. काँग्रेसला 0 – 4 जागा मिळू शकतात. आम आदमी पार्टीला 45.6 टक्के, भाजपला 37.1 टक्के, काँग्रेसला 4.4 टक्के आणि इतरांच्या वाट्याला 12.9 टक्के मतदान होईल अशी शक्यता आहे.

तर 2015 साली विधानसभा निवडणूकीचा विचार केला तर आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागांवर मोठा विजय मिळाला होता. भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले होते तर काँग्रेसला भोपळा ही फोडता आला नव्हता.

दिल्ली विधानसभा निवडणूकीत मतदानासाठी 13,750 मतदान केंद्र आहेत. यंदा सर्व पक्षांचे मिळून एकूण 672 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत, ज्यात 593 पुरुष तर 79 महिलांचा समावेश आहे.