दिल्ली विधानसभा : भाजपला 41 जागा मिळतील, स्वामींनी केलं ‘भाकीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाकीत केलं आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळणार आहे. सध्या दिल्लीत शाहीन बागेतील आंदोलन आणि मरगळलेली अर्थव्यवस्था अशा परिस्थितीत देखील दिल्लीत भाजप झेंडा फडकवणार असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे.

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे भाकीत वर्तविले आहे. तसेच ते म्हणाले की, तुकडे तुकडे गँगने रास्ता रोको केला आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला, तरीही भाजप ४१ जागांवर विजयी होणार हे मी आधीच सांगितलं होतं. आता तर मला पूर्ण विश्वास आहे की भाजप ४१ हून अधिक जागांवर विजयी होणार असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

सध्या दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बागेत जोरदार आंदोलन सुरू आहेत आणि या आंदोलनावरून भाजपाने विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने आरोप केलाय की काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आशीर्वादामुळेच शाहीन बागेत आंदोलन सुरू आहेत त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीन बागचा मुद्दा प्रचंड चर्चेचा मुद्दा बनलाय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जवळपास १३७५० पोलिंग बूथवर १.४६ कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मागील पाच वर्षाचा विचार केला तर सगळ्या पक्षांना धूळ चारत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून मोठे यश संपादन केले होते. २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसला तर आपले खाते देखील उघडता आले नव्हते तर भाजपाला कशाबश्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान दिल्लीतील आपचे सरकार वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहे.