दिल्ली : देशाच्या राजकारणाला नवे वळण देणारी निवडणुक, केजरीवालांच्या ‘झाडू’ला 54 जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली विधानसभेतील निकालाने देशाच्या राजकारणाला एक नवे वळण लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,  आप 54, भाजप 16 आणि काँग्रेस 0 जागांवर पुढं आहे. आता आपचा विजय निश्चित मानला जात आहे.

एक्झिट पोलमध्ये सर्वांनीच आपला बहुमत दिले़ तर भाजपाला अगदी ९ ते २६ जागा दिल्या आहेत. मात्र, एक्झिट पोल फेल जाणार आहे. दुपारी ३ नंतर भाजपाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. एकूण मतदानापैकी १७ टक्के मतदान दुपारी ३ नंतर झाले असून त्याची नोंद या एक्झिट पोलमध्ये नाही. मतदानानंतर घेतलेल्या माहितीमध्ये आम्हाला ४१ जागा मिळणार असल्याचा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री व दिल्लीचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. दुसरीकडे मतदान पार पडल्यानंतरही मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास निवडणुक आयोगाने २४ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इतका वेळ लागण्यामागे कारण काय अशी विचारणा करुन इव्हीएममध्ये घोटाळा केल्याची शंका उपस्थित केली आहे.

या सर्व दाव्याप्रति दाव्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा करुन २०१४ मध्ये सत्ता हस्तगत केली. त्यांनतर २०१९ मध्ये आपल्या पाच वर्षाच्या कामावर मत मागावीत अशी अपेक्षा होती. मात्र, त्याच वेळी घडलेल्या पुलवामा व त्यानंतरचे एअर स्टाईक हे प्रचारातील प्रमुख मुद्दे बनवून पाकिस्तानविरोधात प्रचारात घोषणाबाजी करण्यावर मोदी यांनी भर दिला होता. त्यांच्या या प्रचाराला जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत भाजपाला ३०३ जागा मिळवून दिला. तरीही त्यांनी आपल्या कामावर मत मागण्याची संधी गमावली. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारने काम करु न देण्याचा जणू विडाच उचलला होता. अशातून त्यांनी दिल्लीत वीज, पाणी, शिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

या कामाच्या बळावर देशात सर्व प्रथम एक पक्ष लोकांकडे मत देण्याचे आवाहन करीत आहेत. दुसरीकडे भाजपाने हिंदु, मुस्लिम ध्रुवीकरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. तरीही केजरीवाल हे आपल्या मतावर ठाम राहिले. ते आपण ५ वर्षांमध्ये केलेल्या कामाविषयी प्रचारात बोलत राहिले. एक्झिट पोलमध्ये आप ची सरशी झाल्याचे दिसत आहे. ते प्रत्यक्ष निवडणुक निकालामध्ये परावर्तीत झाले तर देशात एक नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या पुढे देशभरातील विविध राज्यांमधील निवडणुकीत भावनिक नाही तर प्रत्यक्ष कामावर सत्ताधारी पक्षांना मते मागण्याची वेळ येणार आहे. दुसरीकडे भाजपाने या निवडणुकीसाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व अस्त्राचा वापर केला.

देशभरातील नेत्यांना दिल्लीत आणून अगदी माजी मुख्यमंत्र्यांनाही दारोदार फिरविले. धार्मिक धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. भाजपाला यश मिळाले तर, एक देशभरात वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यातून एक वेगळे समीकरण बनण्याची शक्यता आहे. कामापेक्षा सत्ता, कार्यकर्ते आणि भावनिक आवाहन, धार्मिक धुव्रीकरण हे मुद्दे महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. देशाच्या राजकारणाला वेगळे वळण त्यातून लागणार आहे. त्यामुळेच दिल्लीकर काय कौल देतात, याला वेगळे महत्व आहे.