Delhi Election : 52,47,43,8,0,0 दिल्लीमध्ये असा आहे काँग्रेसच्या उतरतीचा ‘घटनाक्रम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल लागण्यास अजून काही तासांचा अवधी असला तरी आम आदमी पक्ष प्रचंड बहुमतांनी आपली सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चितच झाले आहे. सध्या आप ६३ जागांनी तर भाजपा ७ जागांनी पुढे आहे. तर काँग्रेसने अजून आपले खाते देखील उघडले नाही. ही एक लज्जास्पद बाब आहे की देशातील सर्वात जुन्या पक्षाला अजून खाते देखील खोलता आले नाही. दिल्लीत काँग्रेसने शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात जवळपास १५ वर्ष सत्ता स्थापन केली आहे.

१९९८ मध्ये सुरु झाले शिला युग
दिल्लीतील १९९८ ची निवडणूक ही कॉंग्रेसच्या उदयाची सुरुवात होती. या निवडणुकांमध्ये महागाई हा प्रमुख मुद्दा होता आणि असे म्हटले जाते की कांद्याच्या महागाईने भाजपा सरकारला खाली आणले होते. तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. शीला दीक्षित यांची खऱ्या अर्थाने सुरुवात इथूनच झाली आणि त्या पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यावेळी विधानसभेत कॉंग्रेसला ७० पैकी ५२ जागा मिळाल्या आणि सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ १५ जागा मिळाल्या असून भाजपाला फक्त ३४ टक्के मते मिळाली होती.

२००३ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस राज
२००३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आपला विजयाचा झेंडा फडकावला होता. त्यावेळी काँग्रेसला ४७ जागा मिळाल्या होत्या. आणि पुन्हा एकदा शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात आले होते. या निवडणुकीत काँग्रेसला ४८.१३ टक्के मतं मिळाली होती. तर भाजपाला एकूण २० जागांवर समाधान मानावे लागले तर ३५ टक्के मतं दिल्लीकरांनी भाजपाला दिली होती.

२००८ मध्ये शिला दीक्षित यांनी केली विजयाची हॅट्रिक
२००८ च्या निवडणुकीत शिला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने तिसऱ्यांदा आपली सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसला एकूण ४३ जागा मिळाल्या होत्या तर ४० टक्के मतं जनतेने काँग्रेसला दिली होती.

२०१३ मध्ये बाजी पलटली
काँग्रेसने जरी विजयाची हॅट्रिक केली तरी २०१३ ला बाजी पलटली आणि काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. कारण कॉमनवेल्थ घोटाळा आणि अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा उदय झाला आणि याचा जोरदार फटका काँग्रेसला बसला. २०१३ ला भारतीय जनता पार्टी ३१, आम आदमी पार्टी २८ आणि काँग्रेसला फक्त ८ जागा मिळाल्या. यात भाजपाला ३३ टक्के, ‘आप’ला २९ टक्के तर काँग्रेसला २४ टक्के मतं मिळाली होती. दरम्यान आम आदमी पार्टीने काँग्रेस सोबत सरकार स्थापन केली परंतु हे सरकार फक्त ४९ दिवस चालू शकले. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.

२०१५ मध्ये काँग्रेसचे सर्वात खराब प्रदर्शन
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. आम आदमी पक्षाच्या उभारीमुळे विरुद्ध पक्षांना एकही जागा मिळवता आली नाही. भाजपाला फक्त ३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला खाते देखील खोलता आले नाही. आम आदमी पक्षाला ७० जागांपैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात पुन्हा आपचे सरकार स्थापन झाले. आम आदमी पक्षाला सुमारे ५४ टक्के, भाजपला ३२ टक्के आणि कॉंग्रेसला केवळ ९.७ टक्के मते मिळाली. म्हणजेच दोन वर्षातच कॉंग्रेसची मतांची टक्केवारी २४ वरून १० वर आली.

२०२० मध्ये काँग्रेसला पुन्हा ‘शून्य’ जागा
सन २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला असून खाते देखील खोलण्यात यश मिळाले नाही. दरम्यान काँग्रेसने सकाळपासून एका जागेवर देखील आघाडी घेतलेली नाही त्यावरून काँग्रेसला ‘शून्य’ जागा मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेससाठी ही एक मोठी लाजिरवाणी बाब आहे.