केजरीवालांना दहशतवादी म्हणणं ‘किती’ महागात पडलं ? ‘त्या’ तिघांचं निवडणूकीत काय झालं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले असून भाजपा आणि काँग्रेसला चारही मुंड्या चीत केले आहे. दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि जवळपास २०० खासदार हे दिल्लीत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तळ ठोकून बसले होते. त्यामुळे यावेळची निवडणूक ही प्रचंड चुरशीची होईल असे समजले जात होते. परंतु ‘आप’ ने ही निवडणूक एकतर्फी ठरवली आहे.

दरम्यान निवडणुकीदरम्यान भाजपाच्या काही नेत्यांनी केजरीवालांना लक्ष करून त्यांच्यावर जहरी टीका केल्या. मात्र दिल्लीकरांनी मतदानातून उत्तर दिले आणि भाजपाच्या सर्व दिग्गज नेत्यांना नाकारून पुन्हा एकदा केजरीवालांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या.

कपिल मिश्रांचा मोठा पराभव
कपिल मिश्रांनी २०१५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आप च्या बाजूने निवडणूक लढविली होती. त्यांच्याकडे जल मंत्रालयाचा कार्यभार देखील सोपवण्यात आला होता. मात्र त्यांनी केजरीवालांवर टीका केली आणि पक्षाला रामराम ठोकला. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केजरीवालांना दहशतवादी म्हटलं. त्यांच्या या जहरी टीकेला दिल्लीच्या जनतेने मतदानातून उत्तर दिले असून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे. आप च्या अखिलेश त्रिपाठी यांनी त्यांचा ११ हजार मतांनी पराभव केला आहे.

परवेश वर्मांना शाहीन बागेवरुन राजकारण करणं पडलं महागात
भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी लोकसभेत पश्चिम दिल्लीचं प्रतिनिधीत्व केले होते. विधानसभेच्या प्रचारादरम्यान त्यांनी आप आणि केजरीवालांवर मोठ्या प्रमाणात तोंडसुख घेतलं. वर्मांनी शाहीन बाग, बिर्यानी, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा विविध शब्दांचा वापर केला. वर्मा यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या तब्बल दहा जागा येतात. मात्र त्या सर्व १० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे.

तेजिंदर सिंह बग्गा यांचा दारुण पराभव
तेजिंदर सिंह बग्गा यांना भाजपाकडून हरी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. फायर ब्रँड नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात बग्गा यांनी अनेकदा केजरीवालांना धारेवर धरत त्यांच्यावर टीका केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विटरवर देखील सक्रिय राहून अनेक टीका केल्या. या प्रचारादरम्यान त्यांनी जाहीरपणे केजरीवालांना दहशतवादी म्हटले होते. दरम्यान आपच्या उमेदवार राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा १७ हजारहून जास्त मतांनी पराभव केला आहे.