22 वर्षानंतर देखील दिल्लीत भाजपचा ‘वनवास’ कायम ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभांचे निकाल आज हाती यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये आठ वर्ष जुन्या असलेल्या आम आदमी पक्षाला 50 हुन अधिक जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच आता दिल्लीचे नेतृत्व पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल करणार हे सुनिश्चित झाले आहे. मात्र केंद्रात असलेल्या भाजपने या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावून देखील त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळताना दिसत नाही.

भाजपच्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण
विजयाने आम्ही अहंकारी होत नाही, पराभवाने खचून जात नाही अशा आशयाचे पोस्टर भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात लागल्याने भाजपने अगोदरच पराभव मान्य केला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

दिल्लीत भाजपचा वनवास कायम
भाजपने दिल्लीत अखेरचा विजय पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 1993 ला मिळवला होता. या एकाच टर्ममध्ये भाजपने मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मुख्यमंत्री दिले होते. यानंतर सलग तीन वेळा काँग्रेसने दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्त्वात सत्ता मिळवली. तर 2013 आणि 2015 ला केजरीवाल मुख्यमंत्री झाले.

सध्या दिल्लीतील तीन महापालिका आणि 7 लोकसभा मतदारसंघातही भाजपचं वर्चस्व आहे. पण विधानसभेवर झेंडा फडकवण्याचं भाजपचं स्वप्न यावेळीही अपूर्ण राहण्याची चिन्हं आहेत संपूर्ण जागांचे कल अद्याप हाती आलेले नसले तरी आपकडे बहुमत येणार हे निश्चित झाले आहे.