Delhi Election : ‘उत्साहात होते भाजपचे कार्यकर्ते पण बूथवर कोणीच गेलं नाही’, पराभवावर गिरिराज सिंहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने भरपूर दावे केले परंतु त्यांना फक्त ८ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या पराभवावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दावा केला आहे की, दिल्लीत मध्ये भाजपचे कार्यकर्ते अति उत्साहात होते, या कारणामुळे ते बुथवर मतदान करण्यासाठी पोचलेच नाही. भाजपच्या पराभवाचे हेच कारण आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर असा दावा करण्यात येत आहे की, दिल्लीमध्ये भाजपच्या एकूण कार्यकर्त्यांची संख्या ही ६२ लाख आहे, परंतु भाजपला दिल्लीमध्ये केवळ ३५ लाख मतदान मिळाले आहे. दिल्ली भाजप सदस्यता अभियानाचे सहप्रभारी हर्ष मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत भाजपचे २८ हजार सक्रिय सदस्य आहेत. तर सदस्यांची एकूण संख्या १७ लाख आहे.

दिल्ली निवडणुकीचा बिहारवर परिणाम होणार नाही : गिरीराज सिंह
बिहारच्या बेगूसरायमध्ये दिल्लीच्या पराभवाबद्दल गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की कार्यकर्ते उत्साहाच्या भरात मतदान करायलाच गेले नाहीत. मात्र, दिल्लीत झालेल्या पराभवामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावर कोणताही बदल होणार नसल्याचेही ते म्हणाले. जे लोक सीएएला विरोध करीत आहेत, ते एक प्रकारे संसदेला विरोध करीत आहेत. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीच्या निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा बिहारच्या निवडणुकीवर आहेत. या निकालांचा बिहारच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा गिरीराज सिंह यांनी केला आहे. त्यांच्या मते लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एनडीए विधानसभा निवडणुका देखील जिंकू शकेल.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिल्लीत केवळ ८ जागा जिंकल्या आहेत. पक्षाकडून सातत्याने दावा केला जात होता की यावेळी त्यांना दिल्लीत ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील. परंतु हे सर्व दावे खोटे ठरले आहेत. दिल्लीत भाजपाला ३८.५१ टक्के मते मिळाली आहेत. ज्यामध्ये एकूण मतांची संख्या ३५७५४३० आहे.