आम्हीच राज्य करू हा ‘अहंकार’ दिल्लीकरांनी उतरवला, शिवसेनेचा भाजपावर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचे वर्चस्व मान्य केले आहे. त्यामुळे सर्व ताकद पणाला लावून देखील भाजपला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. या निकालावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपला दिल्लीतील लोकांनी नाकारले आहे असे म्हणत अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे. असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.

सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना, कधी तरी उतरवतात. आपची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत. तसेच मोदींच्या देशद्रोहासंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे.

शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिल होत आता दिल्लीकरांनी भाजप नेतृत्वाला पूर्णपणे डावलले आहे. भाजपने दिल्लीसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती मात्र तरी देखील त्यांना विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे भाजपचे जे प्रमुख दिल्लीत बसतात त्यांनाच दिल्लीने नाकारले असल्याचे आम्ही समजतो असे मत शिवसेनेचे अनिल परब यांनी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे.