दिल्लीमध्ये ‘एक होती काँग्रेस’ ! विधानसभा निवडणुकीत 66 पैकी 63 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेत काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी केली आहे. पक्षातील 66 उमेदवारांपैकी 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या जागांवर काँग्रेसला एकूण मतदांपैकी पाच टक्के सुद्धा मतदान मिळालेले नाही. 15 वर्ष निरंतर दिल्लीमध्ये सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. गांधी नगर मधील अरविंदर सिंह लवली, बादली समधील देवेंद्र यादव आणि कस्तूरबा नगरमधील अभिषेक दत्त याच उमेदवारांना केवळ आपले डिपॉझिट वाचवता आले आहे.

जर एखाद्या उमेदवाराला ऐकून मतदानाच्या 17 % मतदान मिळाले नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांच्या मुलीला देखील आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही. तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांच्या मुलगी प्रियांका सिंह यांना देखील आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही.

कसे जप्त होते डिपॉझिट
जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या मतदारसंघातील मतांच्या एकूण सहावा भाग इतकी मते पडली नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते. काँग्रेसचे अनेक उमेदवारांना पाच टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले आहे. हार मान्य करून काँग्रेसने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसने म्हंटले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहे आणि यापुढे पक्ष दिल्लीमध्ये नवनिर्माणाचा संकल्प करणार आहे. दिल्लीच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.