व्देषाच्या वक्तव्यांमुळं पक्षाचं नुकसान झालं, दिल्ली पराभवाबद्दल अमित शहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला तर भाजपचा पराभव झाला. या निवडणूकीमध्ये भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर आपने तब्बल 62 जागा जिंकल्या. दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर गृहमंत्री अमीत शहा यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच भाष्य केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी लढवत नाही. कोणतंही सरकार बनवणं किंवा पाडणं हा आमचा उद्देश नसतो. भाजप एक विचारसरणीसाठी निवडणूक लढतं, असे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या निवडणुकीत माझा अंदाज चुकला, अशी कबुली त्यांनी दिली.

अमित शहा पुढे म्हणाले, गोली मारो…, भारत-पाक मॅच अशी वक्तव्य आम्ही करायला नको होती. पक्षाच्या नेत्यांनी अशी वक्तव्य केल्याने भाजपचं या निवडणुकीमध्ये मोठे नुकसान झाले. कुणीही अतिरेकी पद्धतीने मतप्रदर्शन करू नये, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. ते देशासाठी विघातक आहे. त्यामुळेच आम्ही शाहीनबाग आंदोलनात अशी वक्तव्यं करणाऱ्या शर्जिल इमामला अटक केल्याचे शहांनी सांगितले.

दिल्लीमधल्या शाहीबागच्या आंदोलकांना तुम्ही भेटणार आहेत का ? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी माझ्या कार्यालयाकडून वेळ मागून घ्यावी. आम्ही तीन दिवसांच्या आत त्यांना वेळ देऊ. या आंदोलकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तसाच आम्हालाही आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. काँग्रेसने धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अमित शहा यांनी केला. शाहीनबाग आंदोलन आणि पॉप्युलर फ्रंट इंडिया या संघटनेचा काही संबंध आहे का, याचाही आम्ही तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like