शेतकरी आंदोलन : टिकरी बॉर्डरवर शेतकर्‍याने फास घेऊन दिला जीव, सुसाइड नोटमध्ये काय लिहिले जाणून घ्या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांचे आंदोलन मागील 73 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर रात्री उशीरा एका शेतकर्‍याने फास लावून आपला जीव दिला. मृत्यूपूर्वी शेतकरी कर्मबीर यांनी सुसाइड नोट लिहिली ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडून मिळणार्‍या वाईट वागणुकीमुळे त्रस्त असल्याचे म्हटले आहे.

कर्मबीर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले – भारतीय किसान युनियन जिंदाबाद. प्रिय शेतकरी बांधवांनो, हे मोदी सरकार सतत तारखा देत आहे, याचा काही अंदाज नाही की काळा कायदा केव्हा रद्द होईल. जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही.

कर्मबीर (52) हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील सिंघवाल गावातील राहणारे आहेत. काल रात्री ते आपल्या गावातून टिकरी बॉर्डरवर पोहचले होते. कर्मबीर यांना तीन मुली आहेत आणि एका मुलीचे लग्न झाले आहे. या शेतकर्‍याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.