दिल्लीत सर्वाधिक 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई, अरविंद केजरीवालांचे ‘Twit’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर फक्त ८ हजार रुपये नुकसान भरपाई राज्यपालांनी जाहीर केली आहे. त्यावर टिष्ट्वट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संधी साधत दिल्ली शेतकऱ्यांना देशात सर्वाधिक हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देत असल्याचा दावा केला आहे.

यंदा सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती व त्यानंतर ओला दुष्काळ, अवकाळी यामुळे राज्यात जवळपास ९३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळींबे, संत्रा यांच्या बागा उद्वस्त झाल्या आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट असून राज्यपालांनी प्रति हेक्टरी ८ हजार रुपये अशी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. याशिवाय ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंत १६ हजार रुपये मिळणार आहे. द्राक्ष, संत्रा, डाळींब अशा बागांचे हेक्टरी लाखोंनी नुकसान झाले आहे. भात, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झाली असताना नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी आहे.

दिल्ली राज्यात दिल्ली शहराबरोबरच अनेक गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर दिल्ली सरकार त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देते. शेतकरी आणि लागवडीखालील शेतीचे प्रमाण कमी असल्याने दिल्ली सरकारला ते शक्यही होते.

दिल्लीत लवकर विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विविध घोषणा करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. या वृत्ताची दखल घेऊन आपण शेतकऱ्यांना कशी व किती मदत देतो आहोत, हे दाखवून देण्याची संधी केजरीवाल यांनी घेतली आहे. देशात शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिली जात असल्याचे टिष्ट्वट करुन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Visit : Policenama.com