डॉक्टरांवर हल्ला झाल्यास तक्रार नोंदवण्याची जबाबदारी रुग्णालयाची

पोलीसनामा ऑनलाइन – खासगी असो की शासकीय रूग्णालय अलिकडे रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकार थांबवण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. अनेकदा डॉक्टरांवर हल्ला झाल्यास डॉक्टर स्वताच त्याविरोधात तक्रार करतात. मात्र, दिल्ली सरकारने १६ एप्रिल, २०१९ रोजी जारी केलेल्या नोटीसनुसार आता डॉक्टरांवरील हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण, शिवागीळ झाल्यास याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालय किंवा संस्थेची असणार आहे.

वैयक्तिरित्या तक्रार नोंदवता येणार नाही, असे निर्देश दिल्ली सरकारने राज्यातील रुग्णालयांना दिले आहेत. विशेष म्हणजे अशी नोटीस यापूर्वी देखील काढण्यात आली होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. एखाद्या डॉक्टरला मारहाण झाली तर रूग्णालय प्रशासनाने एफआयआर दाखल केली पाहिजे. कारण त्या डॉक्टरला रूग्णालयासाठी काम करताना मारहाण झालेली असते. त्यामुळे ही जबाबदारी रूग्णाय प्रशासनाने घेतली पाहिजे. शिवाय त्यानंतर कोर्टात देखील रूग्णालय प्रशासनानेच हजर राहिले पाहिजे.

यासंदर्भात सरकारने जारी केलेल्या नोटिशीत नमूद केले आहे की, डॉक्टर, नर्स किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास, त्याला शिवीगाळ झाल्यास त्या व्यक्तीने वैयक्तिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू नये. संबंधित रुग्णालय किंवा संस्थेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच संबंधित रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगण्याऐवजी अशा प्रकरणांची तक्रार रुग्णालय किंवा संस्थेमार्फत ताबडतोब नोंदवली जावी ही संबंधित रुग्णालयाचे संचालक किंवा वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी आहे.

Loading...
You might also like