विद्यार्थी शिकण्यात कमी नाहीत, तर शिक्षकच शिकवण्यात ‘फेल’ झाले : दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हायकोर्टाने आज एका खटल्याची सुनावणी करताना ‘विद्यार्थी शिकण्यात कमी पडले नाहीत तर शिक्षकच शिकविण्यात अयशस्वी झाले’ असे म्हणत शिक्षणव्यवस्थेवर निशाणा साधला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव शाकधर यांनी ही टीका केली आहे. यासह, कोर्टाने दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या नियमासही स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दोनदा नापास झाल्यास शाळेने पुन्हा प्रवेश न देण्याची तरतूद आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्या शुक्रवारी दोन मुलांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. इयत्ता ९ मध्ये नापास झाल्यामुळे मुलाला त्याच्या शाळेत प्रवेश नाकारला गेला. दिल्ली सरकारच्या या शाळेने म्हटले होते की विद्यार्थी दोनदा नापास झाला आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या नियमांनुसार, इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत सलग दोन वर्षे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश देता येणार नाही, असा युक्तिवादही केला गेला.

विद्यार्थ्याचे वडील कचरा गोळा करण्याचे काम करतात. यासंदर्भात दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने एप्रिल २०१४ आणि ऑगस्ट २०१८ मध्ये जारी केलेल्या आपल्या परिपत्रकांना देखील वकील अशोक अग्रवाल यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

विद्यार्थ्याच्या वतीने वकील अशोक अग्रवाल यांनी कोर्टात सांगितले की, दिल्ली सरकारचे हे परिपत्रक भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, २१ आणि २१ ए मध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करीत आहे. त्यांनी न्यायालयात सांगितले की या परिपत्रकाच्या आधारे सरकारी शाळांनी शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे, जे बेकायदेशीर आहे.

या प्रकरणाचा सखोल विचार करण्याची गरज असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता १६ डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी होईल. तोपर्यंत दिल्ली सरकारच्या परिपत्रकावर बंदी घातली जाईल.

Visit :- policenama.com