दिलासादायक ! प्लाझ्मा थेरेपीनं केली कमाल, आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आल्यानंतर आता ते बरे झाले आहेत. या थेरेपीनंतर त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली असता ती निगेटिव्ह आली आहे. यामुळे लवकरच जैन यांना रुग्णालयातून डिस्चार्जही दिला जाणार आहे.

ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जैन यांना रूग्णालयात दाखल कण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांना तपासणीत आढळून आले होते. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती प्रथम निगेटिव्ह आणि नंतर पॉझिटिव्ह आली होती. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोविड-19 वरील उपचारांसाठी त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. या थेरपीमुळे फुफ्फुसांमधील इन्फेक्शन कमी झाले, शिवाय त्यांना ऑक्सिजन सपोर्टवरून सुद्धा काढण्यात आले. एका दिवसातच त्यांना आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती नेगेटिव्ह आली असल्याने लवकरच त्यांना घरी सोडले जाईल.

दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांना माहिती दिली की, प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे. मात्र ही थेरेपी मॉडरेट रुग्ण म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवरच परिणामकारक ठरत आहे.

अशी केली जाते प्लाझ्मा थेरपी

जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्याच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जाते. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतले जाते. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवले जाते. कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. यामुळे प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतात, अशी माहिती एम्स हॉस्पिटलचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.