दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन रूग्णालयात दाखल, होणार ‘कोरोना’ टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे सत्येंद्र जैन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जैन यांची कोरोना संसर्गाची चाचणी देखील करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे सातत्याने बैठकांना उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठक घेतल्या होत्या. त्या सर्व बैठकांना सत्येंद्र जैन यांनी आरोग्यमंत्री म्हणून उपस्थिती लावली होती. यापूर्वी ताप व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने अरविंद केजरीवाल यांची देखील कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली होती. परंतु, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर रुजू झाले.

दिल्लीतील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ४२ हजारांच्या पुढे गेली असून, १४०० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेतली. त्यानंतर अमित शहा यांनी महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग संदर्भात चर्चा केली. या बैठकीस लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती कृती आराखडा तयार करण्यात आला.