Coronavirus : ‘ कोरोना’पासून ‘मुक्ती’ लवकर नाहीच, प्रत्येक 11 दिवसात दुप्पट होतोयत रूग्ण, दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशाची राजधानी दिल्लीवर सध्या कोरोनाचे तीव्र संकट ओढवले आहे. दररोज शेकडो कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत, तर मृतांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आकड्यांसह सांगितले कि, दिल्ली किती वाईट टप्प्यातून जात आहे आणि कोरोनाचे संकट किती गंभीर आहे. माहिती देताना जैन म्हणाले की, मागील दिवसांच्या आकडेवारीचा विचार करता आता दिल्लीत दर 11 दिवसांनी कोरोना प्रकरणे दुप्पट होत आहेत. दरम्यान, चांगली गोष्ट अशी आहे की, येथे रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. कोरोनातील 20 टक्के पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.

सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची एकूण 5,532 प्रकरणांची नोंद आहेत. त्यापैकी 428 प्रकरणे केवळ बुधवारी नोंदली गेली. या कोरोना प्रकरणांपैकी 3,925 सक्रिय प्रकरणे आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 84 जण आयसीयूमध्ये तर 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत. सत्येंद्र जैन म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूपासून मुक्त होण्याची कोणतीही आशा नाही. कोरोना दीर्घकाळ राहणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 7 मे गुरुवारी सकाळी भारतातील कोरोना विषाणूची संख्या वाढून 52952 झाली आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत देशात 1783 लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे एकूण 52952 प्रकरणांपैकी 15266 लोक या विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोना विषाणूची एकूण सक्रीय प्रकरणे 35902 आहेत.