JNU प्रकरण : दिल्ली हायकोर्टकडून Apple, WhatsApp आणि Google ला नोटिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या संदर्भात आता दिल्ली उच्च न्यायालयाने, अ‍ॅपल, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटिसा बजावल्या आहेत. उच्च न्यायालयाने ५ जानेवारीला जेएनयू कॅम्पसमधील हिंसाचाराशी संबंधित डेटा संरक्षित करण्यास सांगणारी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. विशेष म्हणजे जेएनयूच्या तीन शिक्षकांनी हा डेटा संरक्षित करण्याची मागणी केली होती.

प्राध्यापकांच्या याचिकेवर सुनावणी :
दिल्ली उच्च न्यायालय जेएनयूच्या तीन प्राध्यापकांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. या याचिकेमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व व्हिडिओ संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की, विद्यापीठाला या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज मागितले गेले आहे, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

व्हाट्सएप आणि अ‍ॅपलला चॅटही सुरक्षित ठेवण्याचे निर्देश :
लोकांमधील चॅटच्या माध्यमातून झालेले संभाषणही सुरक्षित ठेवले पाहिजे, असे हायकोर्टाने या कंपन्यांना सांगितले आहे. याद्वारे हिंसाचाराशी संबंधित महत्त्वपूर्ण संकेत मिळू शकतात. तसेच व्हिडिओ आणि इतर रेकॉर्डिंगही सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ५ जानेवारीला जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हिंसाचारानंतर हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे पोहोचले असून त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आता एसआयटी या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करणार आहे. त्याच वेळी, हिंसाचाराच्या तपासासंदर्भात, गुन्हे शाखेच्या एसआयटीने जेएनयू कॅम्पसमध्येच तपासासाठी आपले कार्यालय केले आहे. आता एसआयटी या प्रकरणात येथे सर्व आरोपींची चौकशी करेल. महत्वाचे म्हणजे यापूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात एसआयटीने ९ विद्यार्थ्यांचा फोटो जारी केले होते आणि त्यांच्यावर हिंसाचाराचा आरोप करत चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/