अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ‘कोरोना’मुक्त; AIIMS मधून डिस्चार्जनंतर पुन्हा ‘तिहार’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आता तो कोरोनातून बरा झाला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता छोटा राजनची पुन्हा तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

छोटा राजन विरोधात अपहरण आणि हत्येसह 70 पेक्षा जास्त प्रकरणे दाखल आहेत. त्याला मुंबईतील वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्ये प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. छोटा राजन कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने 22 एप्रिलला एम्स रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. आता त्यातून राजन बरा झाला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, छोटा राजन याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची अफवा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. तसेच काही न्यूज पोर्टलवरही याचे वृत्त झळकत होते. मात्र, एम्सच्या डॉक्टरांनी या सर्व वृत्ताचे खंडन केल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या अफवा अखेर थांबल्या होत्या. त्यानंतर आता छोटा राजन कोरोनातून बरा झाला असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.