दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर तर मुंबई चौथ्या स्थानावर

मुंबई : वृत्तसंस्था
जगाच्या पाठीवर सर्वात प्रदूषित शहर कुठले? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर दिल्ली असे येईल. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने केलेल्या वायू प्रदूषणाच्या चाचणीत दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. तसेच मुंबई ही जगाच्या नकाशावर चौथे सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई गेल्या वर्षी पाचव्या क्रमांकावर होती. पण आता या शहरातील वायू प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. तर, याच चाचणीत दिल्ली क्रमांक एक म्हणजे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे म्हटले आहे. दिल्ली पाठोपाठ, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या चार प्रदूषित शहरांची नावे आहेत. त्यामुळे, जगातील दर 10 माणसांपैकी नऊ लोक प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे.

वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. तसेच वायू प्रदूषणामुळे हृदय समस्या, श्वसन रोग या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचे दिसते.