Big news : दिल्लीतील एका नर्सनं IPL 2020 मध्ये भारतीय क्रिकेटपटूसोबत साधला चुकीच्या पद्धतीने संपर्क, केली होती ‘ही’ मागणी – रिपोर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या युएईमध्ये खेळल्या गेलेल्या 13 व्या सत्रात एका भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) शी चुकीच्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार दिल्ली येथील एका नर्सने सोशल मीडियावर भारतीय खेळाडूशी संपर्क साधला आणि संघातील प्लेइंग इलेव्हन सहित अन्य माहिती विचारली. या मुलीला माहिती मिळवून सट्टा लावायचा होता. मात्र, भारतीय क्रिकेटपटूने तिला कोणतीही माहिती दिली नाही आणि पोलिसांना कळविले जाईल असे देखील सांगितले. ही घटना 30 सप्टेंबरची आहे. आयपीएल 2020 (IPL 2020) यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

अहवालानुसार बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंह यांनीही याची पुष्टी केली आहे. अजित सिंह म्हणाले की, खेळाडूने आम्हाला आयपीएल दरम्यान या घटनेविषयी सांगितले. आम्ही याची चौकशी केली आणि आता हे प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. ज्या मुलीने खेळाडूसोबत संपर्क साधला तो अनप्रोफेशनल होता आणि त्याचा कोणत्याही सट्टेबाजीच्या टोळीशी संबंध नव्हता. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केली. आरोपी मुलगी त्या खेळाडूला ओळखत होती. जेव्हा खेळाडूने आम्हाला कळविले तेव्हा आम्ही सर्व तपशील तपासले. एवढेच नाही तर मुलीकडे चौकशी देखील केली पण आम्हाला काहीही सापडले नाही. आता हे प्रकरण बंद झाले आहे.

तीन वर्षांपूर्वी सुरू झाले होते संभाषण

या अहवालानुसार तीन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू आणि नर्स ऑनलाईन भेटले होते. तिने स्वत:चे वर्णन भारतीय क्रिकेटपटूची फॅन म्हणून केले आणि सांगितले की ती दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे. भारतीय क्रिकेटपटू देखील नुकताच तिच्या संपर्कात आला होता, जेव्हा त्याने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत तिच्याशी सल्लामसलत केली होती.

तथापि, त्या खेळाडूचे म्हणणे आहे की ते दोघे फक्त सोशल मीडियावर बोलत असत आणि ते एकमेकांना भेटलेले नाहीत. ती मुलगी कुठे राहते आणि ती कुठे काम करते हेदेखील भारतीय क्रिकेटरला माहिती नाही. भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान मुलगी म्हणाली की तिला सट्टा लावायचा आहे, त्यामुळे तिला सामन्याविषयी आणि प्लेइंग इलेव्हनविषयी माहिती हवी आहे. यानंतर, त्या खेळाडूने तिला तसे न करण्यास सांगितले आणि टीम मॅनेजमेंटला याबाबत माहिती दिली.