खून प्रकरणात ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचं नाव आलं समोर; पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर ‘रेड’

नवी दिल्ली : दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियममध्ये मागच्या मंगळवारी कुस्तीपटूंच्या दोन गटात हाणामारी झाली होती, ज्यामध्ये एका 23 वर्षांच्या कुस्तीपटूचा मृत्यू झाला. घटनेत ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचे सुद्धा नाव समोर आले आहे, ज्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या टीमने त्याच्या घरावर छापा मारला आहे.

या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह दोन कुस्तीपटूंच्या घरावर छापा टाकला आहे. पोलिसांनुसार, टीम सुशील कुमारच्या घरी पोहचली होती परंतु तो घरी नव्हता. ज्यानंतर आता अनेक टीम गठित करण्यात आल्या असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, प्रकरणात सुशील कुमारचा नेमका कोणत्या प्रकारचा सहभाग आहे.

उपचारादरम्यान 23 वर्षीय कुस्तपटूचा मृत्यू
दिल्ली पोलिसांना मागच्या मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजता छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली होती. हाणामारीत जखमी झालेल्या कुस्तीपटूला बीजेआरएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ज्यानंतर प्रकृती खालवल्याने त्यास ट्रॉमा सेंटल येथे हलवण्यात आले, जिथे बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव सागर कुमार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकरणाचा तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, सागरला अतिशय जबर मारहाण करण्यात आली होती, यामुळे त्याचा मृत्यू झाला. सोबतच त्याच्या दोन मित्रांना सुद्धा स्टेडियमच्या बाहेर मारहाण करण्यात आली. आता संपूर्ण प्रकरणात ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारची भूमिका कोणती होती याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आता यापूर्ण प्रकरणात दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.