राजधानी दिल्लीत हायअलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती मिळते आहे. यामुळे दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणा आयबीने ही माहिती जारी केली आहे. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतात दिल्ली एअरपोर्टसह इतर गर्दीच्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दहशतवाद्यांकडून आगळीक करण्याचा शक्यता असल्याचा अर्लट नेहमीच मिळत असतो, पण असे सध्या काहीही नसताना अशा प्रकारे माहिती मिळणे धक्कादायक आहे. त्यामुळे अलर्टला गंभीरपणे घेतलं जात आहे. अलर्ट मिळाल्यापासून दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी तपास वाढविण्यात आला आहे. विशेष करून दिल्ली एअरपोर्टवर विमान हायजॅकची शक्यता आणि रेल्वे स्टेशनवर गोळीबाराची शक्यता लक्षात घेता प्रत्येक गाडीची तपासणी केली जातीये. दरम्यान, अलर्टमध्ये कुठल्याही दहशतवादी संघटनेचे नाव लिहिण्यात आलेले नाही. पण यामागे लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदचा हात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत दहशतवादी घुसल्याची माहिती नसली तर काही दिवसांपासून काही दहशतवादी संघटना दिल्लीमध्ये मोठे काम करण्याच्या विचारात असल्याचं समजते आहे.

दिल्लीचे पोलीस अधिकारी अमूल्य पटनायक यांनी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी व उपाययोजनांसाठी सर्व पोलिसांची बैठक नुकतीच घेतली होती़