CAA आंदोलनाचं ISIS कनेक्शन ! शाहीनबागच्या आंदोलनकर्त्यांना ‘आतंकवादी’ हल्ल्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या दाम्पत्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या जामिया नगरमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. दिल्लीचे डीसीपी प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले की, येथून दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे आयएसआयएसशी संशयास्पद कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही संशयित जम्मू काश्मीरचे राहणारे आहेत. त्यांच्यावर शाहीन बागमध्ये धरणे आंदोलन करणार्‍या लोकांना दशहतवादी हल्ल्यासाठी चिथावणी देण्याचा आरोप आहे.

ओखलाच्या जामिया नगरमधून पकडले
प्रमोद सिंह यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या जोडप्याचे आयएसआयएस कनेक्शन समोर येत आहे. त्यांची नावे हिंद बशीर बेग आणि जहानजेब सामी आहेत. त्यांना ओखलाच्या जामिया नगरमधून पकडण्यात आले. त्यांच्यावर लोकांना सीएएविरूद्ध भडकावण्याचा आरोप आहे.

आयएसआयएसच्या खुरासान मॉड्यूलशी संबंध
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचाही आयएसआयएसच्या खुरासान मॉड्यूलशी संबंध आहे. सीएए आंदोलनाबाबत आयएसआयएस कनेक्शन समोर आल्यानंतर पोलीसांसह अन्य तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. होळीच्या सणानिमित्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.

दिल्लीतील हिंसाचार
उत्तर-पूर्व दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएच्या समर्थनासाठी सुरू झालेल्या आंदोलनानंतर काही दिवसांपूर्वी हिंसाचार उसळला होता. यानंतर हा हिंसाचार दिल्लीतील अनेक भागात पसरला होता. यामध्ये अनेकांचा बळी गेला. लोकांची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसाचारामुळे लोक पोलीस आणि प्रशासनावर आरोप करत आहेत. तब्बल चार दिवसानंतर हा हिंसाचार थांबला होता.