…म्हणून होतंय DCP ‘जितेंद्र’ यांचं ‘कौतुक’ !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांना अनेकदा चोरी झालेलं महागडं सामान, दागिने, रोख रक्कम यांचा शोध घेतल्याचं माहीत आहे. परंतु, या पोलिसाने एका आईच्या हातच्या बनलेल्या ‘सत्तूच्या रोटी’ची बॅग शोधून दिली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती डिसीपी जितेंद्र यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट दिली आहे. दिल्ली पोलिस डिसीपी जितेंद्र मणि त्रिपाठी यांनी केलेल्या या कामाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसांत असलेले डिसीपी जितेंद्र मणि त्रिपाठी यांनी एका अननोन नंबरवरुन व्हॉट्सअपवर मेसेज आला. आईच्या हातच्या सत्तूच्या रोट्या आणि खाण्याचं इतर सामान असलेली एक बॅग मेट्रोमध्ये राहिल्याचं, या मेसेजमध्ये लिहिलं होतं. हीच बॅग शोधून देण्याची मागणी त्या तरुणाने डिसीपी जितेंद्र यांच्याकडे केली. शुक्रवारी रात्री जवळपास १० च्या सुमारास त्यांना हा मेसेज आला होता. त्यानंतर डिसीपी जितेंद्र यांनी या बॅगेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

डिसीपी जितेंद्र यांना मेजेस करणारा तरुण बिहारमधील छपरा येथील राहणारा आहे. परंतु परीक्षेच्या तयारीसाठी तो दिल्लीत राहतो. तो मागील १० महिन्यांपासून त्याच्या घरी गेला नव्हता. त्यामुळे बिहारवरुन आलेल्या त्याच्या मित्रांकडे, त्याच्या आईने एका बॅगेत सत्तूच्या रोट्या आणि इतर खाण्याचे काही जिन्नस पाठवले होते. त्याचे मित्र लक्ष्मी नगर येथे राहत असल्याने, तो आईने पाठवलेली बॅग घेण्यासाठी मित्राकडे लक्ष्मी नगर येथे पोहोचला. त्याच्या मित्राकडून बॅग घेतली आणि लक्ष्मी नगर मेट्रो स्टेशनवरुन तो साकेत येथे निघाला होता. त्याचवेळी राजीव मेट्रो स्टेशनवर, दुसऱ्या मेट्रोमध्ये जाताना त्याची ही बॅग हरवली. त्यानंतर त्या तरुणाने एका मित्राकडून डिसीपी जितेंद्र यांना नंबर घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली.

जितेंद्र यांनी सांगितलं की, त्या तरुणाचा मेसेज आल्यानंतर कंट्रोल रुम स्टॉफला याबाबत माहिती दिली आणि जवळपास २ तासांनंतर रात्री १२ वाजता त्या तरुणाची बॅग मिळाली. आईने पाठवलेली ही बॅग त्या तरुणाकडे पोहोचवल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू होते, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगून जात होता, असं जितेंद्र यांनी म्हटलं आहे. आयुष्यात अशी काही कामं असतात, ती केल्यानंतर संतृष्टी मिळते, अतिशय आनंद होतो, हे काम त्यापैकीच एक होतं, असं जितेंद्र मणि त्रिपाठी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.