शेतकरी आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 8 वरिष्ठ अधिकार्‍यांची उचलबांगडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  शेतकरी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार या घटनांचा मोठा परिणाम दिल्ली पोलिसांवर पडला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांमध्ये डीसीपी (पोलिस मुख्यालय) चिन्मय बिस्वाल यांच्या नावाचाही समावेश आहे.

राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु होती. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता दिल्ली पोलिस ‘ऍक्शन मोड’वर आले आहे. त्यामुळेच पोलिस आयुक्त श्रीवास्तव यांनी 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

2008 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी बिस्वाल आता गुन्हे शाखेचे डीसीपी असतील. यामध्ये बिस्वाल यांच्यासह इतर 7 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त दीपक पुरोहित यांना पदोन्नती मिळाली. त्यांना आता अतिरिक्त पोलिस आयुक्त या पदावर पोलिस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदावर उर्विजा गोयल आता डीसीपी (पश्चिम, दिल्ली) होतील.

चिन्मय बिस्वाल यांच्यावर विशेष जबाबदारी

12 मार्च, 2020 मध्ये आयपीएस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांना पोलिस उपायुक्त (मुख्यालय) नियुक्ती केली होती. यापूर्वी ते डीसीपी (दक्षिण-पूर्व) म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे गुन्हे शाखेच्या डीसीपी पदाचा कार्यभार असेल.