धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचार झाला होता. या हिंसाचारातील हिंदू आरोपींबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या भागात झालेल्या हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा कट असल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या आरोपींना तिहार जेलमध्ये असलेल्या आरोपींनी मर्क्युरी (पारा) देऊन मारण्याचा डाव रचला होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तिहार जेलमध्ये बंद असलेले शाहिद आणि जेलच्या बाहेर असलेल्या असलम या दोघांनी हा डाव रचला होता. त्यानुसार, असलम याने शाहिदपर्यंत मर्क्युरी पोहोचवला होता. दिल्ली हिंसाचारादरम्यान मौजपूर पुलिया आणि शिव विहार पुलिया या ठिकाणाजवळ हत्या करणाऱ्या आरोपींची तुरुंगात हत्या करण्याचे षडयंत्र होते. या षडयंत्राची कुणकूण स्पेशल सेलला लागल्यानंतर त्यांनी टेक्निकल सर्व्हिलान्स ठेवणे सुरु केले आणि त्यांचा हा डाव हाणून पाडला. दिल्ली पोलिसांनी तिहार जेलमधून मर्क्युरी जप्त केला आहे. त्यासह दोन आरोपींनाही अटक केली आहे.

23 फेब्रुवारीला झाला होता हिंसाचार
गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला दिल्लीच्या उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या जाफराबाद भागात दुपारी 3 वाजता अचानक दंगल झाली. त्याची धक संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरली होती. यामध्ये 53 लोकांचा जीव गेला होता. गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित आणि दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल रतन लाल हेदेखील या दंगलीचे शिकार झाले होते. आत्तापर्यंत 751 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.