जामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून ‘चार्जशीट’ दाखल, शरजील इमामवर ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जामिया-न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी पोलिसांनी साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पोलिसांनी सांगितले आहे की जिथे हिंसाचार झाला तेथून 3.2 मिमी पिस्तूलचे रिक्त काडतूस सापडले. या प्रकरणी पोलिस अद्याप सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय पुरावे म्हणून सीसीटीव्ही, सीडीआर आणि 100 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

शरजील इमामवर हिंसा भडकवल्याचा आरोप
या प्रकरणात जेएनयूचे माजी विद्यार्थी शर्जील इमामवर हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. पण दिल्ली पोलिसांच्या या आरोपपत्रात जामियाच्या कोणत्याही विद्यार्थ्याचे नाव समाविष्ट नाही. त्याचवेळी शरजील इमाम याला 3 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, ते आणखी बऱ्याच संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर करणार आहेत, जेणेकरून त्यांची ओळख पटेल. आरोपपत्रानुसार आतापर्यंत या प्रकरणात 17 लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी जामिया प्रकरणात 7 एनएफसी आणि 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींवर लादले ‘हे’ कलम :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले सर्व आरोपी स्थानिक आहेत. पोलिसांनी न्यायालयात दाखल आरोपपत्रात कलम 307, 147, 148,149, 186, 353, 332, 427 आणि इतर कलम लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 95 लोक जखमी झाले असून त्यात 47 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या हिंसाचारादरम्यान 6 बस आणि 3 खासगी वाहनांचे नुकसान झाले. दिल्ली पोलिसांनीही या घटनेत पीएफआयच्या भूमिकेचा उल्लेख केला असून त्याचा तपास सुरू आहे.