दिल्ली हिंसाचार : तापानं फणफणले होते पोलिस कर्मचारी रतन लाल, तरीदेखील समाजकंटकांचा केला सामना, झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) उत्तर पूर्व दिल्लीत सुरू असलेला निषेध सोमवारी हिंसक झाला आणि यात यावेळी कर्तव्य बजावणारे दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचे निधन झाले. मौजपुरात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. हा हिंसाचार रोखण्यासाठी रतनलाल यांनी मध्यस्थी केली असता ते दगड लागून जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या वेळी रतनलाल कर्तव्यावर होते, त्यावेळी त्यांना ताप होता परंतु तरीही शांतता राखण्यासाठी ते कर्तव्यावरच राहिले आणि उपद्रव्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत राहिले .

हिंसाचारात मृत्यू झालेले दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल रतन लाल मूळचे राजस्थानचे होते. 7 वर्षांपासून ते दिल्लीत एसीपी गोकुळपुरी कार्यालयात ऑपरेटर म्हणून तैनात होते. इकडे हिंसाचारात रतनलालच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पत्नी पूनम बेशुद्ध झाल्या. रतनलाल यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीतील अमृत विहार भागात राहते आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही खराब असल्याचे समजते. रतनलाल यांच्या पश्चात पत्नी पूनम, दोन मुली आणि एक 9 वर्षांचा मुलगा आहे. रतनलाल यांची तिन्ही मुलं अजूनही शिकत आहेत. कुटुंबप्रमुखाच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिल्ली पोलिस कर्मचारीही अमृत विहारमधील रतनलाल यांच्या घरी पोहोचले.

त्यांचे कुटुंब विचारत आहे की, अखेर रतन लालची काय चूक होती आणि ते फक्त आपले कर्तव्य बजावत होते, मग त्या लोकांनी त्यांना टार्गेट का केले? दरम्यान, दिल्लीतील तणावपूर्ण वातावरणानंतर गृह मंत्रालय सतत दिल्ली पोलिसांशी संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत आहे. झाफराबाद, मौजपूरसह अनेक भागात सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर मंगळवारी भजनपुरा येथे दोन गटात दगडफेक सुरू झाली.

दिल्लीत सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. दगडफेक सुरू झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीमुळे अनेक लोक जखमी झाल्याचेही समजते. परिस्थिती हाताळण्यासाठी निमलष्करी दलाच्या 37 कंपन्याही प्रभावित भागात तैनात केल्या आहेत. सीएएच्या समर्थनार्थ आणि विरोधात भजनपुरा चौकात दोन गट आमनेसामने आले तेव्हा दगडफेक सुरू झाली. सोमवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील झाफराबाद, मौजपूरसह अनेक भागात हिंसाचार सुरू झाला. यावेळी उपद्रव्यांनी दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी आग लावली.