JNU हिंसाचार प्रकरणात 9 जणांची ओळख पटली, नोटीस जारी केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली आहे. या हल्लेखोरांनी हल्ला करताना आपले चेहरे झाकले होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, काही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आले असून दिल्ली पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देणार आहेत. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

दिल्ली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जॉय टिर्की यांनी सांगितले की, जेएनयू हल्ल्या प्रकरणाच्या तपासावरून चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. 1 जानेवारी ते 5 जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होणार होते. मात्र, SFI, AISE, AISF आणि DSF संघटनेच्या विद्यार्थींनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना धमकावले. यानंतर या ठिकाणी हिंसाचार घडला. 5 जानेवारी रोजी साबरमती आणि पेरियार हॉस्टेलमधील काही रुमवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती टिर्की यांनी दिली.

पोलीस उपायुक्त टिर्की यांनी पुढे सांगितले की, जेएनयू येथे हल्ला करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आले होते. चेहरा झाकलेल्यांना माहिती होते की त्यांना कोण-कोणत्या खोल्यांमध्ये जायचे आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. दरम्यान, हल्ला करणाऱ्यांचा व्हिडीओ मिळाला असून त्याद्वारे पोलिसांची त्यांची ओळख पटवली आहे. याप्रकरणी 30 ते 32 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
रविवारी रात्री जेएनयूमध्ये चेहरा झाकलेल्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत घोष आणि इतर विद्यार्थ्यांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. जेएनयू घटनेनंतर स्थानिक पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्या आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/