CAA विरोध : दिल्लीच्या शाहीन बागेत कलम 144 लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीमधील शाहीन बागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्या शाहीन बागेत आता जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात लोकांनी एकत्र येऊ नये, आंदोलन करू नये अशी नोटीस दिल्ली पोलिसांनी बजावली आहे. जमावबंदीचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशार दिल्ली पोलिसांनी दिला आहे.

जमावबंदीचा आदेश दिल्यांनतर या भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफ़ाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी म्हणजे १ मार्च या दिवशी शाहीन बागेतील आंदोलकांना हटवण्यात येईल अशी घोषणा हिंदू सेनेने केली होती. त्यानंतर शाहीन बागेत मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

आंदोलकांनी आपले आंदोलन आता थांबवावे असे आवाहनही पोलिसांनी आंदोलकांना केले आहे. दिल्ली पोलीस हे आंदोलन हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे ट्विट हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी केले. भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १९ आणि २१ अंतर्गत येथील सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलिसांनी शाहीन बागेला बॅरिकेड्स लावून वेढले आहे. तिथे सीआरपीसी चे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आता इथे कोणालाही आंदोलन करण्यास सक्त मनाई असल्याचे दिल्ली पोलीसांनी स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबर २०१९ पासून शाहीन बागेत सीएए विरोधात आंदोलन सुरू आहे.