काय सांगता…! धोबी आणि माळीकामासाठी MBA, MA, MSC झालेल्या तरुणांचे अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंजिनिअर असलेल्या तरुणांनी वडापाव किंवा चहाचे दुकान काढल्याच्या अनेक घटना तुम्ही पहिल्या आणि ऐकल्या असतील. देशात शिकलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे पण नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. आता दिल्ली पोलिसांनी धोबी,स्वयंपाकी,बागकाम कर्मचाऱ्यांकरिता ७०७ जागांची भरतीची जाहिरात काढली होती. विशेष म्हणजे या जागांकरिता तब्बल साडेसात लाख अर्ज आले असून एमबीए, एमसीए,एमए, एमएससी झालेल्या अनेक तरुणांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत.

परीक्षा देण्यासाठी उमेदवारांची वाढती संख्या पाहता पोलीस विभागाने परीक्षेची काठिण्य पातळी वाढवली आहे. परीक्षेची काठिण्य पातळी आता सब इन्स्पेटकटर पदाच्या परीक्षेइतकी करण्यात आली आहे. ही परिक्षा दोन स्तरांवर घेण्यात येते. पहिली परिक्षा लेखी स्वरुपाची असते तर दुसरी परिक्षा नैपुण्य परिक्षा असते. दुसऱ्या परिक्षेत धोबी कामासाठी कपडे धुणे, बागकामाचा नमुना देणे, स्वयंपाक करणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. पहिली परीक्षा ८० गुणांची तर दुसरी परीक्षा २० गुणांची आहे. येत्या काळात या परीक्षांचे स्वरूप अजून कठीण करण्यात येण्याची चर्चा आहे.

सरकारी नोकरीकडे कल
देशात सध्या प्रचंड बेरोजगारी आहे. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांपेक्षा तरुणांचा कल सुरक्षेची हमी देणाऱ्या सरकारी नोकऱ्यांकडे जास्त दिसतो आहे. दिल्ली पोलिसांत धोबी, स्वयंपाकी अशा विविध पदांसाठी निघालेल्या जागांसाठी अपेक्षित पात्रता १०वी असूनसुद्धा ३ लाखाहून अधिक एम.ए, एमएससी उमेदवारांनी, ३००० अभियंत्यांनी तर १२०० एमबीएनी अर्ज भरले आहेत. मुख्य म्हणजे तामिळनाडू, केरळ या हजारो किमी दूरवरच्या राज्यातील तरुणांनीही या पदांसाठी अर्ज भरले आहेत.