हिंसाचारादरम्यानच दिल्लीत 5 IPS अधिकार्‍यांच्या ‘बदल्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्लीतील हिंसाचारादरम्यान दिल्ली पोलिसांच्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. संजय भाटिया यांना मध्य विभागाचे डीसीपी करण्यात आले असून सध्या त्यांना विमानतळावर तैनात करण्यात आले आहे. एमएस रंधावा यांच्याकडे अतिरिक्त सीपी गुन्हेगारीची जबाबदारी देण्यात आली आहे तर राजीव रंजन यांना विमानतळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच शंखधर मिश्रा यांच्याकडे वाहतुकीचे अतिरिक्त सीपी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर प्रमोद मिश्रा यांना रोहिणीचे डीसीपी करण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २१ जखमी झालेल्या लोकांचा मृत्यू जीटीबी रुग्णालयात तर एकाचा एलएनजेपी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलिसांना हिंसाचारग्रस्त चांदबाग पुलिया येथील नाल्यात अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला. अंकित आयबीमध्ये सुरक्षा सहाय्यक पदावर कार्यरत होते.

उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाने बुधवारी सकाळपासून फ्लॅग मार्च सुरू केला आहे. येथे हिंसाचारग्रस्त भागात सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय परिसरात अग्निशामक दलाची वाहने, पोलिस दंगाविरोधी वाहन, वज्र आणि रुग्णवाहिकांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि अर्धसैनिक दल देखील तैनात करण्यात आले आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचार थांबल्यानंतरही पोलिसांना बुधवारी इंटेलिजन्स ब्युरोच्या सुरक्षा सहाय्यकाचा मृतदेह सापडला आहे. हिंसाचारग्रस्त भागातील चांदबाग येथे पोलिसांना हा मृतदेह सापडला आहे. उत्तर-पूर्व दिल्लीच्या खजुरी खास येथील रहिवासी अंकित शर्मा असे मृताचे नाव असून अंकित शर्मा हे मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. त्यांचे वडील रविंदर शर्मा देखील आयबीमध्ये नोकरी करतात.