शेतकऱ्यांच्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस ‘ऍक्शन मोड’वर; मोठी कारवाई करणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून, शेतकऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. यामध्ये शेकडो पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता पोलिसांनी या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे.

दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रजासत्ताकदिनी प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers Tractor Rally) हिंसक वळण लागले आहे. या आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा लाल किल्ल्यावर वळवला. शेतकरी आणि पोलिस यांच्यामध्ये झालेल्या हिंसाचारात 300 पोलिस जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. तर दिल्ली पोलिसांकडून 15 एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी यातील सर्व आंदोलक शेतकऱ्यांवर भा.दं.सं (IPC) कलम 395 (लूट), 397, 120 (b) आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेचे पोलिस करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.