वकिलांवरील कारवाईसाठी अडले दिल्ली पोलिस, म्हणाले – ‘पोलिस आयुक्त कसा हवा, किरण बेदी सारखा हवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील तीस हजारी कोर्टाबाहेर पोलिस आणि वकील यांच्यातील वाद शमण्याचे चिन्हे दिसत नाही. वकिलांनी केलेल्या संपानंतर आता दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांनीही आवाज उठवायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच निरीक्षक पदापासून ते हवालदारपर्यंत अनेक पोलीस कर्मचारी पोलिस मुख्यालयासमोर एकत्र येऊन निषेध करत आहेत.

वकिलांवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही वकिलांच्या अरेरावी विरोधात शांततेत निदर्शने करू आणि आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडू. पोलिस हातात फलक घेऊन घोषणा देत आहेत. या फलकांवर ‘सेव्ह पोलिस’ आणि ‘हम भी इंसान है’ सारख्या घोषणा लिहिल्या आहेत.

या निषेधात सामील असलेल्या एका महिला कॉन्स्टेबल म्हणाल्या, ‘आम्हाला दररोज कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हे लोकांना कळत नाही. जर आम्ही स्वतःचे रक्षण करू शकत नाही तर इतरांचे संरक्षण काय करणार ? आम्हीसुद्धा माणूस आहोत आणि सम्मानाने जगण्याचा आम्हालाही अधिकार आहे.

दिल्ली पोलिसांत निषेधाचे संदेश व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपच्या दोन ग्रुपमध्ये दिल्लीत वकिलांनी पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सर्व पोलिसांना आयटीओ येथे पोलिस मुख्यालयात पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. सेवानिवृत्त सैनिक आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनाही आवाहन करण्यात आले. ज्या ग्रुपमध्ये हे मेसेजेस व्हायरल होत होते तो ग्रुपमध्ये दिल्ली पोलिसांच्या सेवानिवृत्त सैनिकांद्वारे चालविला जात आहे.

सकाळी साडेआठ वाजल्यापासून पोलिस कर्मचारी मुख्यालयात एकत्र येऊ लागले. कोणी येथे गणवेशात आले तर कोणी युनिफॉर्मशिवाय साध्या कपड्यांमध्ये प्रदर्शन करण्यासाठी पोहचले. काही लोकांनी त्यांच्या हातात काळी पट्टी देखील बांधली आहे. या निदर्शनात महिला पोलिस कर्मचारीही सामील झाल्या आहेत.

शनिवारी शुल्लक कारणावरून पोलीस आणि वकिलांमध्ये वाद वाढला आणि त्यानंतर वकिलांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. वकिलांनी कोर्टाचा दरवाजा आतून बंद केला असा आरोप केला जात आहे. पोलिसांनाही आत जाऊ दिले नाही. या चकमकीत पोलिस आणि वकीलही जखमी झाले.

वकिलांच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल-

वकील आणि पोलिसांच्या चकमकीनंतर सोमवारी साकेत कोर्टाबाहेर वकिलांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वकील दुचाकीवरून चाललेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. पोलिस घटनास्थळावरून बाहेर जात असताना वकिलाने त्याचे हेल्मेटही दुचाकीला फेकूनही मारले.

 

Visit : Policenama.com