CM केजरीवाल यांना नजरकैद केल्याचा ‘आप’चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेटच फोटो दाखवला अन्…

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना नजरकैद केल्याचा ‘आप’चा आरोप दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. दिल्लीच्या उत्तर जिल्हा पोलीस उपायुक्तांनी मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवास स्थानाबाहेरील फोटो ट्विट करून नजरकैद केल्याचा दावा खोटा ठरवला आहे.

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून आल्यानंतर भाजपच्या पोलिसांनी केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. कुणालाही त्यांच्या घरात जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नाही, असे ट्विट आपने केले आहे.

‘आप’च्या या ट्विटवर दिल्ली पोलीस उपायुक्तांनी प्रत्युत्तर दिले असून, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी नजरकैद केल्याचा दावा खोटा आहे. कायद्यानुसार त्यांना मिळालेल्या सर्व अधिकारांचा ते कोणत्याही अडथळ्यांविना वापर करत आहेत. त्यांच्या घराबाहेरील परिस्थितीचे हे चित्र सारे काही सांगून जात असल्याचे ट्विट दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी केले आहे.