Coronavirus : राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 58 बळी, जाणून घ्या इतर आकडेवारी

दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 1652 नवीन कोरोनाची प्रकरणं नोंदवण्यात आली. याच दरम्यान 58 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्ली कोरोना बाधित रुग्णांचा संख्या वाढून 1 लाख 18 हजार 645 इतकी झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3545 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये 658 कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1652 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासह कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 1 लाख 18 हजार 645 झाले आहे. सध्या दिल्लीत कोरोनाचे 17407 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 1994 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 97693 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात सर्वाधिक 32 हजार 695 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि 606 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या 9 लाख 68 हजार 876 आहे, त्यामध्ये 24 हजार 915 लोक मरण पावले आहेत