दिल्ली हिंसाचार : IB कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यावर ‘चाकू’चे 18 वार झाल्याचे PM रिपोर्टमध्ये स्पष्ट, AAP कडून ताहिर हुसेनची ‘हकालपट्टी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आय बी चे काँस्टेबल अंकित शर्मा यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला असून त्यांच्या शरीरावर चाकूने ठिकठिकाणी तब्बल १८ वार करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याअगोदर अंकित शर्मा यांचा गोळी लागल्याने मृत्यु झाल्याचे सांगितले जात होते. दिल्लीमध्ये दंगल उसळली, त्यावेळी गुप्तचर विभागात काँस्टेबल असलेले अंकित शर्मा (वय २६) चांद बाग परिसरातून घरी जात होते. त्यावेळी काही जणांनी घेरले व त्यांच्यावर चाकूने अत्यंत निर्घुणपणे वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नाल्याजवळ फेकुन दिला होता. बुधवारी चांद बाग परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता.

त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी आपण आजवरच्या शवविच्छेदनाच्या कामात एखाद्याच्या शरीरावर इतक्या निदर्यतेने चाकूने केलेले वार यापूर्वी पाहिले नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या शरीराच्या सर्व भागावर हल्लेखोरांनी वार केले होते.

अंकित शर्मा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ‘आप’चे आमदार ताहिर हुसेन यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आमदार ताहिर हुसेन यांच्या कारखान्याच्या इमारतीच्या छतावर दगड, पेट्रोल बॉम्ब, सोडा वॉटरच्या बाटल्या सापडल्या असून फॉरेन्सिक पथकाने इमारतीच्या आतून अनेक नमूने घेतले आहे. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एन. एन. श्रीवास्तव यांनी गुरुवारी स्वत: मुस्तफाबाद परिसरात फिरुन लोकांशी संवाद साधला.

ताहिर हुसेन याने दंगल झाली त्यावेळी आपण घरी नव्हतो. आपण या सर्व प्रकरणात निर्दोष असून आपणच दंगलीमधील एक पिडित असल्याचा दावा केला आहे. ‘आप’ ने ताहिर हुसेन याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अंकित शर्मा यांचे वडिल रविंदर शर्मा हेही आय बीमध्ये हेड काँस्टेबल आहेत.