दिल्ली हिंसाचार : शाहीनबागेचे PFI कनेक्शन, दोघे अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली दंगलीचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या विशेष पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष परवेझ अहमद आणि सचिव मोहम्मद इलियास यांना अटक केली आहे. त्यांच्यावर दिल्लीत दंगल भडकवण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्याची फंडिंगबाबतही चौकशी करण्यात येत आहे.

परवेझ यांची चौकशी (ईडी) देखील करत आहे. दानिश यांच्या अटकेनंतर, परवेझ आणि इलियास यांना दिल्ली दंगलीच्या तपासात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्यांचा शाहीन बाग आणि पीएफआय यांचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे.

पूर्वीपासूनच होता पीएफआयवर संशय

पोलिसांचा यापूर्वीच पीएफआयवर संशय होता, मात्र पोलीस ठोस पुराव्यांच्या शोधात होते. पीएफआयचा शाहिन बागेशी संबंध असल्याचे पुरावे आपल्या हाती लागेल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पीएफआयसह आणखी तीन संस्थांवर गुप्तचर संस्थांनी देखील दिल्ली दंगलीनंतर संशय व्यक्त केला होता. त्यासोबत अजून कोणत्या संघटना, संस्था, पक्ष यांचा संबंध आहे का याचीही माहिती उघड होणार आहे. या हिंसाचारात २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच प्रमाणे या दंगलीदरम्यान मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दिल्लीत उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत ५२ लोकांना आपले प्रमाण गमवावे लागले आहेत.

‘यूपीतून आलेल्या ३०० जणांनी दिल्लीत दंगल घडवली’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दंगलीवरील चर्चेला उत्तर देताना दंगलीबद्दल माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना मीच ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाला भेट देण्यास सांगितलं होतं. दंगलग्रस्त भागात पाहणीसाठी मीही जाऊ शकलो असतो पण याने पोलिसांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं असतं, त्यामुळे मी गेलो नाही. तसेच अमित शहा म्हणाले की, पोलिसांनी ३६ तासांत दंगल नियंत्रणात आणली. या दंगलीसाठी ३०० जण यूपीतून दिल्लीत आले होते.