दिल्ली हिंसाचार : पूर्वनियोजित आणि एकतर्फी, आयोगाचा ठपका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईशान्य दिल्ली दंगलीबाबत अल्पसंख्याक आयोगाने आपला ‘फॅक्ट फाइंडिंग’ अहवाल सादर केला असून, ही दंगल पूर्वनियोजित आणि एकतर्फी होती असा असा धक्कादायक खुलासा यात केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी केलेल्या भडकावू भाषणाने ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकला. या हिंसाचारात मुस्लिम धर्मियांच्या घरांचे आणि दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. खजुरी खास परिसरातील लोकांनी हि माहिती आयोगाला दिल्याचे त्यात म्हणले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते कपिल मिश्रा यांना आयोगाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र आयोगाचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही, असे अहवालात म्हणले गेले आहे.

दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचा ‘फॅक्ट फाइंडिंग’ अहवाल हा दोन पानांचा असून दंगलीच्या वेळी अधिक नुकसान व्हावे यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. तसेच ईशान्य दिल्लीत दंगलखोरांनी घरांचे आणि दुकानांचे नुकसान करत लूटही माजवली, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. मात्र या अहवालात दिल्ली पोलिसांचे कौतुक करण्यात आले असून दिल्ली हायकोर्टाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढले आहेत.

दंगल पीडितांना सरकार तुटपुंज्या प्रकारची आर्थिक मदत देत असून हि मदत वाढवण्याची गरज आहे, तरच ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकतील असे या अहवालात म्हणले आहे. दंगलग्रस्त ईशान्य दिल्ली भागाचा दौरा केल्या नंतर आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केला.त्यांनी चांद बाग, जाफराबाद, ब्रिजपुरी, गोकुळपुरी, मुस्तफाबाद, शिवविहार, खजुरा, यमुना विहार आणि भजनपुरा परिसराचा दौरा केला त्यात त्यांनी घरे, दुकाने, शाळा आणि मशिदींचीही पाहणी केली.