शिक्षक-पालकांमध्ये अजूनही ‘कोरोना’ची धास्ती ! शाळा बंदच राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 21 सप्टेंबरपासून काही ठराविक राज्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. असं असलं तरी अनेक राज्यात मात्र आजही शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊ शकलेले नाहीत. कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतही राज्य सरकारनं अगोदर 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी शाळा उघडण्याची ही तारीख आता अनिश्चित काळापर्यंत आणखी पुढं ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

याचं कारण देताना सिसोदिया यांनी सांगितलं की, शिक्षक आणि पालक बैठकांमध्ये मिळालेल्या फीडबॅकमध्ये शाळा बंद ठेवण्याचा विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळं दिल्लीच्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा यापुढील आदेशापर्यंत बंदच राहतील असं सिसोदिया यांनी जाहीर केलं.

सिसोदिया यांनी सांगितलं की, जगभरात ज्या ज्या ठिकाणी कोरोना संक्रमणादरम्यान शाळा उघडण्यात आल्या आहेत तिथं लहान मुलांमध्ये संक्रमण वाढल्याचं दिसून आलं आहे. अशा वेळी दिल्लीच्या शाळा उघडण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ठ केलं.

उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या उच्च शिक्षण संस्थांत यंदा 1330 जागा वाढवण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक 630 जागा बीटेक साठी, बीबीएसाठी 120 जागा, 220 जागा बीकॉम साठी, 120 जागा बीए (इकॉनॉमिक्स) साठी, 90 जागा बीसीएसाठी आणि 60 जागा एमबीएसाठी वाढवण्यात आल्या आहेत.