काँग्रेसचा वर्धापन दिन, राहुल गांधी अगोदरच परदेशात

नवी दिल्ली : काँग्रेसचा आज १३६ वा वर्धापन दिन देशभरात साजरा करण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असलेले राहुल गांधी हे आदल्या रात्री परदेशात गेल्याचे समजते. त्यामुळे आज सकाळी काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अंथोनी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची वेळ काँग्रेसवर आली.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपविण्यात आले. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याच्या बाजूने बहुतांश नेते आहेत.

काँग्रेसचा १३६ वा वर्धापनदिन आज देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. मात्र, त्याचवेळी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या तयारी असलेले राहुल गांधी हे परदेशात गेले आहेत. त्यामुळे भाजपाला आयतेच कोलीत मिळाले आहे.

 

 

 

 

 

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ‘‘ देश हित की आवाज उठाने के लिए काँग्रेस सुरु से प्रतिबद्ध रही है. आज काँग्रेस के स्थापना दिवस पर, हम सच्चाई और समानता के अपने उस संकल्प को दोहराते है़’’ असे ट्विट केले आहे. ट्विटरवरुन पक्ष चालविता येत नाही, त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते, अशी टिका काँग्रेसमधील नेतेही खासगीत राहुल गांधींवर करीत असतात. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर होणार्‍या या टिकेकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते.