10 देशांच्या राजदूतांच्या समोरच दिल्लीत साजरा होणार भव्य शिवजयंती ‘सोहळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या देशभरात शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. दिल्लीत देखील शिवजयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दिल्लीत शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील अशी महिती खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून देण्यात आली. विशेष म्हणजे या दिवशी बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या 49, लोधी इस्टेट या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीत स्थित पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस आणि इस्त्रायल या दहा देशांच्या राजदूतांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास होकार दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड आणि बुल्गेरीयाचे राजदूत या सोहळ्याला संबोधित करणार असून पोलंडचे राजदूत खास हिंदीतून संबोधन करतील असे ते म्हणाले. अजूनही काही राजदूतांकडून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत संमती मिळू शकते असा विश्वासही खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी व्यक्त केला.

मागील दोन वर्षांत दिल्लीत शिवजयंती सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बीव्हीजीचे समुह प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असेल असे खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले.

या सोहळ्यात नाशिकमधील 200 वादकांचे ढोल पथक याशिवाय मराठा लाईट इन्फंट्रीचा पाईप बॅंड सहभागी होऊन आपली कला सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे असणार दिल्लीतील शिवजयंती सोहळ्याचे प्रारुप –
सकाळी 9 वाजता पोवाडा सादरीकरणाने शिवजयंती सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात येईल. महाराष्ट्र सदन प्रांगणात वाद्यवृंदाचे आणि खेळांचे सादरीकरण होईल.