Coronavirus Lockdown : तबलीगी जमातच्या मौलाना सद यांना गुन्हे शाखेची नोटीस, विचारले 26 प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलीगी जमातचे अमीर मौलाना मोहमम्मद सद यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सद यांना नोटीस पाठवून मर्कझ संबधीत 26 प्रश्न विचारण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने नोटीसीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सद यांना सांगितले आहे. दरम्यान मौलाना मोहम्मद सदच्या शोध घेण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे. एक दिवस आधी मौलाना सादने एका व्हिडिओद्वारे आपण क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगितले होते.

गुन्हे शाखेने पाठवलेल्या नोटीसमध्ये संस्थेचा संपूर्ण पत्ता आणि नोंदणी संबधित माहिती, संघटनेशी संबंधित कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पत्ता, यामध्ये घराचा पत्ता, त्यांचा मोबाईल क्रमांकासह मर्कझच्या व्यवस्थापनाशी संबंधित लोकांचा तपशील विचारला आहे. तसेच हे लोक मर्कझशी कधी जोडले गेले याचाही तपशील गुन्हे शाखेने मागवला आहे.

यासह मागील तीन वर्षाच्या आयकरचा तपशील, पॅनकार्ड क्रमांक, बँक खात्याचा तपशील आणि एक वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट मागवण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019 पासून मर्कझ येथे आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांची देखील माहिती मागवली आहे. मार्कझच्या आत सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत का, असे विचारण्यात आले आहे. जर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत तर ते कुठे आहेत असा प्रश्न विचारणात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मौलाना साद यांना विचारले आहे की, पोलीस किंवा प्रशासनाकडून कधी परवानगी घेतली होती, या कार्यक्रमात लोकांचा जमाव जमण्यापूर्वी कार्यक्रमाची परवानगी मिळाली होती का ?, 12 मार्च नंतर मर्कझला आलेल्या सर्व लोकांची संपूर्ण माहिती सादर करावी, ज्यामध्ये भारतीय आणि परदेशी लोकांचा समावेश आहे, याची माहिती सद यांच्याकडे मागितली आहे.

तसेच 12 मार्च 2020 नंतर मर्कझला कोण आले होते आणि त्यापैकी किती आजारी होते आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले याची संपूर्ण माहिती गुन्हे शाखेने सद यांच्याकडे मागितली आहे. गुन्हे शाखेकडून संपूर्ण कोरोना कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी मौलाना सदसह सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.