दिल्ली : तीस हजारी कोर्टात तुंबळ ‘हाणामारी’, पोलिस अधिकार्‍यांना वकिलांनी ‘चोपलं’, वाहनांची ‘जाळपोळ’

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात आज पोलीस आणि वकिलांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी कोर्ट परिसरातच गोळीबार केल्याने भडकलेल्या वकिलांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत गाड्यांना आग लावली. त्यानंतर वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना चोप दिली. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला असून तिस हजारी कोर्टाला छावणीचे स्वरुप आले आहे.

पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या वादानंतर वकिलांनी कोर्ट परिसरात असलेल्या पोलिसांच्या गाड्यांना आग लावली. या घटनेत अनेक वकिल आणि पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलीस आणि वकिलाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी वकिलांवर सेंट स्टीफन रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान वकिलांनी पीसीआर गाडीची तोडफोड करून ती पेटवून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या वादातून पोलीस आणि वकिलांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद एवढा वाढला की याला हिंसक वळन लागून पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. यावेळी कोर्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वकिलांची संख्या वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांची कुमक कोर्टात मागवली. या हाणामारीमध्ये विजय वर्मा या वकिलाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलिसांनी गोळीबार केला नसल्याचे सांगितले असून, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करून त्या पेटवून दिल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, लॉक अपच्या बाहेर तीसरी बटालियनचे पोलीस आणि वकिल यांच्यामध्ये पार्किंगवरून वाद झाला. पोलिसांची तीसरी बटालियन आरोपींना कार्टेत हजर करण्याचे काम करते. त्यांच्यात आणि वकिलामध्ये वाद झाला.

Visit : Policenama.com