दुर्दैवी ! ड्युटीवर नसतानाही कर्तव्य बजावणाऱ्या सहायक पोलीस आयुक्तांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण-पश्चिम दिल्लीतील राजोकरी उड्डाणपुलाजवळील एका सर्व्हिस लेनवर भीषण अपघातात दिल्ली वाहतूक पोलीस विभागातील सहायक पोलीस आयुक्ताचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना अक्षरशा 50 फूट लांब फरफटत नेले, ड्यूटीवर नसतानाही रस्त्यावर झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी ते कर्तव्य बजावत होते. संकेत कौशीक असे मृत्यूमुखी पडलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.

अपघातानंतर गंभीर जखमी झाल्यानंर त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोडून ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतील एसीपी संकेत कौशीक यांना एआयआयएमस ट्रामा सेंटर येथे नेण्यात आले, त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी दिली. कौशीक यांची द्वारका ट्राफिक सर्कल येथे नियुक्ती करण्यात आली होती. ते ड्यूटीवरून सरकारी वाहनाद्वारे चालक व ऑपरेटरबरोबर परतत होते. राजोकरी उड्डाणपुलाजवळील एका सर्व्हिस रोडवर त्यांना वाहतूकीची कोंडी झाली असल्याचे निदर्शनास आले.

यामुळे एसीपी कौशीक सहकार्‍यांबरोबर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी वाहनातून खाली उतरले, कौशीक यांच्या वाहनाचा चालक व त्यांच्याबरोबरील सहकारी एका गाडीस मार्ग करून देत असताना, ते एकटेच पुढे रस्त्यावर गेले. या दरम्यान भरधाव आलेल्या एका मिनी ट्रकने कौशिक यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ते जवळपास 50 फूट लांब फरपटत गेले. यामध्ये कौशिक हे गंभीर जखमी झाले होते, नंतर त्यांना रुग्णालयात नेले असता, त्यांचा मृत्यू झाला.