दिल्ली हिंसाचार : आत्तापर्यंत 123 FIR अन् 630 जणांना अटक, पोलिसांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएएवरून दिल्ली हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी 123 जणांवर एफआयआर दाखल केली आहे. तर 630 जणांना पोलिसांनी ताब्यात आणि अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एमएस रांधवा यांनी दिली आहे. तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यामार्फत घटनास्थळांचा पंचनामा करण्यात आला. आत्तापर्यंत मृतांची संख्या 42 झाली असल्याची माहिती रंधवा यांनी दिली.

हिंसाचाराच्या घटनेमध्ये 250 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार जाफराबाद, मौजपुर, चांदबाग, खुरेजी आणि भजनपुरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असल्याची माहिती रंधवा यांनी दिली आहे. कालपासून हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरु केली आहे.

काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्यल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या जवानांच्या घरांवर निशाणा साधला आहे. 25 फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील काही जवानांच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली होती.

सीएए कायद्यावरून दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जाळली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आत्तापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे.